• Fri. Oct 23rd, 2026

कलाकेंद्रातील वादाचा रक्तरंजित शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून 275 किमी दूर जंगलात जाळले!बेशुद्ध नर्तिकेला मृत समजून आरोपींचा संतापजनक कृत्य; 11 तासांचे CCTV फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे तीन दिवसांत हत्याकांडाचा पर्दाफाश

Bybaba maske

Sep 29, 2026

कलाकेंद्रातील वादाचा रक्तरंजित शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून 275 किमी दूर जंगलात जाळले!

बेशुद्ध नर्तिकेला मृत समजून आरोपींचा संतापजनक कृत्य; 11 तासांचे CCTV फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे तीन दिवसांत हत्याकांडाचा पर्दाफाश

रोखठोक न्यूज प्रतिनिधी

कलाकेंद्रातील अंतर्गत वादाने अखेर एका गर्भवती नर्तिकेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या नर्तिकेला मृत समजून आरोपींनी तिचा मृतदेह तब्बल 275 किलोमीटर दूर नेला आणि धुळे जिल्ह्यातील निर्जन जंगलात पेट्रोल टाकून जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. धुळे पोलिस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत या थरारक हत्याकांडाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

मृत नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (31, रा. रायगड) ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रावर काम करत होती. धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ परिसरातील गरताडबारी घाटाजवळील जंगलात तिचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्यापासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

कलाकेंद्रातील वादातून मारहाण; बेशुद्ध पडताच मृत समजले

पोलिस तपासानुसार, पिंकी काटकर हिचा कलाकेंद्रातील काही व्यक्तींशी वाद झाला होता. या वादातून तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मारहाणीनंतर पिंकी बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचा समज झाल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या हाती पुरावे लागू नयेत, यासाठी तिचा मृतदेह दूर नेऊन विल्हेवाट लावण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राजस्थानच्या दिशेने निघाले; धुळ्याच्या जंगलात थांबवले वाहन

पिंकीला वाहनात टाकून आरोपी राजस्थानच्या दिशेने निघाल्याचे तपासात समोर आले. मात्र धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन जंगलात वाहन थांबवून तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि तिला जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

जळालेला मृतदेह आढळताच तपासाला वेग

22 सप्टेंबर रोजी चाळीसगाव-धुळे महामार्गालगतच्या वनक्षेत्रात एका महिलेचा गंभीररीत्या जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

प्राथमिक तपासात सदर महिला धाराशिव येथील महाकाली कला केंद्रात काम करत होती आणि तेथेच तिची आरोपींशी ओळख झाल्याची माहिती समोर आली.

11 तासांचे CCTV फुटेज ठरले तपासातील महत्त्वाचा दुवा

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावरील तब्बल 11 तासांचे CCTV फुटेज तपासले. संशयित वाहनाच्या हालचालींचा माग काढत पोलिस जामखेड येथील सप्तसूर कला केंद्रापर्यंत पोहोचले.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी या प्रकरणातील सहा संशयितांची ओळख पटवली. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

चार आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरू

या प्रकरणात पोलिसांनी
सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (38), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (31), लक्ष्मी बालाजी पवार (30) आणि स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28) यांना अटक केली आहे.

तर फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सर्फराजविरुद्ध यापूर्वीही गुन्हे

अटक करण्यात आलेल्या सर्फराज ऊर्फ शफीक मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पिंकी काटकर हिच्या हत्येमागील नेमका वाद काय होता? हत्येचा कट नेमका कुठे आणि कसा रचला गेला? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह फरार आरोपींची भूमिका काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेने कला केंद्रांच्या आड सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांचा आणि अंतर्गत वादांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणातील प्रत्येक बाबीचा अंतिम निष्कर्ष पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!