केज येथे दोन विचित्र अपघात, पिक-अपला वाचविताना टँकरने पाच वाहनांना धडकले : दोघे किरकोळ जखमी.
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज येथे बीड केज रोडवर एका भरधाव टँकरने रस्त्यावर यु टर्न घेणारे पिक-अप आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटून ते टँकर पाच वाहनाला धडकले आहे. त्यात पाचही वाहनासह टँकरचे नुकसान झाले आहे. तर अन्य दुसऱ्या अपघातात एक माल वाहू ट्रक तहसीलच्या संरक्षक भिंतीला धडकला आहे.
ता बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. ३० जून रोजी सायंकाळी ५:०० वा च्या सुमारास गुजरातहून साबण तयार करण्यासाठी लागणारे ग्लिसरीन केरळ राज्यातील पॉंडेचरीकडे घेऊन जाणारे ३२ टन वजन वाहून नेणारे टँकर क्र. (जी जे-४४/ ए यु-७७४२) जात असताना त्याला केज येथील बीड-केज रोडवर हॉटेल अनिल भोजनालयाच्या समोर कृषी कार्यालया कडून यु-टर्न घेणारे एक पाण्याच्या जारची वाहतूक करणारे पिक-अप क्र. (एम एच-४४/७७४२) अचानक आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात टँकर त्या पिक-अपला धडकून एका स्विफ्ट कार क्र. (एम एच-४७/जी-९७५६) धडकले. त्या नंतर स्विफ्टला धडकल्या नंतर जवळ उभ्या असलेल्या मोटार सायकलीला धडकून एका नव्या कोऱ्या विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीला आणि डॉ. चाटे यांच्या दवाखान्यात समोर उभ्या असलेल्या ओमीनी रुग्णवाहिका क्र. (एम एच-४४/८१४४) धडकले. यात पिकअप, स्विफ्ट, मोटार सायकल, स्कॉर्पिओ, रुग्णवाहिका व टँकरसह एकून सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात पिक-अप चालक व त्याच्या शेजारी असलेला इसम किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान दुपारी १२:०० वा च्या सुमारास केज तहसील कार्यालया समोर एका मालवाही ट्रक क्र (के ए-५६/२१८६) चालकाने एका स्वोर्पिओ गाडीला वाचविताना मालवाहू ट्रक तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर घातला यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
केजच्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली असली तरी वाहन चालक हे त्यांची वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत आणि अनेक वाहन धारक हे गैरशिस्तपणे वाहतुकीचे नियम व वेगमर्यादा याचे उल्लंघन करीत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.