अबब मयत वत्सलाबाई २५ वर्षा नंतर जिवंत होऊन केजच्या रजिष्ट्री कार्यालयात हजर झाल्या….! मयत वात्सलबाई ऐवजी काशीबाईला हजर करून एक एकर जमीनीचे बक्षीस पत्र लिहून घेतले
अबब मयत वत्सलाबाई २५ वर्षा नंतर जिवंत होऊन केजच्या रजिष्ट्री कार्यालयात हजर झाल्या….!
मयत वात्सलबाई ऐवजी काशीबाईला हजर करून एक एकर जमीनीचे बक्षीस पत्र लिहून घेतले
सावत्र आई, सावत्र भाऊ आणि इतर दोघे अशा चौघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेचा २५ वर्षा पूर्वी मृत्यू झाल्या नंतर मयत महिलेच्या सवतीने मृत्यू झालेल्या सवतीच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून तिच्या नावावर असलेली एक एकर जमिनी स्वतःच्या मुलाच्या नावे दुय्यम निबंधक कार्यालयात बक्षिस पत्र करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाच्या फिर्यादी वरून सावत्र आई, सावत्र भाऊ व इतर दोघे साक्षीदार अशा चौघा विरुद्ध खोटे दस्तऐवज करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, आवसगाव ता. केज येथील सौ. वत्सलाबाई उर्फ छबुबाई भागवत जाधव यांनी दि. ३/६/१९९२ रोजी बप्पाजी पवार यांच्या कडून त्यांच्या मालकीची सर्व्हे नंबर २३/२/२ मधील एक एकर (४०) आर जमीन खरेदी केली. त्याचा दि. १३/६/१९९३ रोजी फेरफार क्र. ७३१ नुसार मंजूर करून सदर जमिनीची नोंद महसुली अभिलेख्याला वत्सलाबाई उर्फ छबुबाई भागवत जाधव यांच्या नावाने घेण्यात आली.
दरम्यान दि. २६/११/१९९६ रोजी वत्सलाबाई उर्फ छबुबाई जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा परमेश्वर भागवत जाधव, विवाहित मुलगी निता भ्र. अभीमान भोसले, दुसरा मुलगा गणेश भागवत जाधव आणि पती भागवत नामदेव जाधव असे चौघेजण कायदेशीर वारस आहेत. त्यानी केज न्यायालया कडून किरकोळ दिवाणी दावा क्र. ३५९/२०२१ द्वारे कायदेशीर वारस प्रमाण पत्र मिळविलेले आहे.
भागवत जाधव यांची दुसरी पत्नी काशीबाई जाधव व तिचा मुलगा राम भागवत जाधव यांनी काशीबाई जाधव यांचे वत्सलाबाई जाधव या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून त्या आधारे वत्सलाबाई जाधव यांच्या नावे असलेली एक एकर जमीन (४०) आर या जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालयात केज येथे डे. बु. नं. २८३३ दि. १५/११/२०२२ रोजी राम भागवत जाधव यांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
सदर प्रकरणी परमेश्वर भागवत जाधव यांनी केज न्यायालयात दाखल केलेल्या दाव्या नुसार फौजदारी दंड संहिता प्रक्रिया ५६(३) नुसार परमेश्वर जाधव यांच्या फिर्यादी वरून सावत्र आई काशीबाई भागवत जाधव, सावत्र भाऊ राम भागवत जाधव व त्यांचे साक्षिदार नातेवाईक भारत साहेबराव सावंत आणि केशव.देवराव सावंत या चौघांच्या विरुद्ध दि २८ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४५५/२०२३ भा दं वि ४२०, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, २१८, १२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
घटनाक्रम :-
* दि. ३/६/१९९३ जमीन खरेदी
* दि. १३/६/१९९३ रोजी फेरफार मंजूर
* दि. २६/११/१९९६ वत्सलाबाईचा मृत्यू
* सन १९९८ भागवत जाधव यांचा छबुबाईशी दुसरे लग्न
* दि. १५/११/२०२२ बनावट कागद-पत्रा आधारे बक्षिस पत्र
* दि. २८/७/२०२३ गुन्हा दाखल
————————————————
काशीबाई जाधव व राम जाधव यांचा सदर जमिनीचा दावा केज न्यायालयात प्रलंबित :- परमेश्वर जाधव यांची सावत्र आई काशीबाई जाधव व सावत्र भाऊ राम जाधव यांनी दिवाणी न्यायालय क. स्तर केज न्यायालयात रे. दी. दी. क्र. १८९/२०२० दाखल केलेला असुन सदर दावा अद्याप मा. न्यायालयात प्रलंबीत आहे.
——————————————————————–
आता खरी वत्सलाबाई उर्फ छबुबाई कोण ! :- वत्सलाबाई उर्फ छबुबाई या दि. २६/११/१९९६ रोजी वारल्या परंतु २५ वर्षा नंतर दि. १५/११/२०२२ रोजी त्या दुय्यम निबंध अधिकाऱ्या समोर हजर राहून बक्षीस पत्र करून देतात. हे सर्व अनाकलनीय असून यात दुय्यम निबंधक अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी व दलाल देखील सहभागी असल्याचा संशय आहे. त्यांच्या वरही कारवाई व्हायला हवी.