बहिष्कार…बहिष्कार…बहिष्कार; भाजपशासित राज्यातील 6 जिल्ह्यांत 0 टक्के मतदान
रोखठोक न्युज वार्ताहर
स्थानिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मतदारांनीही या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. आता याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह शिगेला पोहाेचलेला असताना नागालँड या राज्यातील अनेक मतदान केंद्रे ओस पडल्याचे चित्र आहे. या राज्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मतदानाने मतदानाचा हक्क बजावलेला नाही. मतदानाची वेळ संपण्यास आता जेमतेम दोन तास उरलेले असताना मतदार घराबाहेर पडणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.
नागालँडमध्ये सध्या भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. येथील एका लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील ईस्टर्न नागालँड (Nagaland) पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
नागालँडमधील पूर्वेकडील जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत संघटनेने बहिष्काराचे आवाहन केले होते. राज्यात विधानसभेच्या (Assembly) 60 जागा असून, त्यापैकी जवळपास 20 मतदारसंघांमध्ये बहिष्काराचा परिणाम जाणवत आहे. जवळपास सहा जिल्ह्यांतील या मतदारसंघांमध्ये संघटनेचे वर्चस्व मानले जाते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे. संघटनेने गुरुवारीच निवडणूक आयोगाला बहिष्काराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर नागालँडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता.
संघटनेनेही बहिष्काराचा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक असल्याचे उत्तर आयोगाला दिले आहे. पूर्वेकडील भागात शांतता राहावी, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये आणि येथील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बहिष्काराचे आवाहन केल्याचे संघटनेने आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, नागालँडमध्ये लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमध्ये सरळ लढत होत आहे. त्यामुळे आता मतदानावरील बहिष्काराचा फटका कुणाला बसणार, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
