गुरूजी घरी..शाळेत एक्कयावर दुर्री..सांगा,कसा घडणार सक्षम भारत.
शिक्षकाने ठेवला मजुरीवर शिक्षक.
रोखठोक न्युज वार्ताहर
तलासरी: विद्येची देवता असलेल्या श्रीगणेशाच्या आराधनेचा उत्सव सुरू असतानाच ज्यांनी विद्यादानाचे काम करत पुढची पिढी घडवायची त्या शिक्षकानेच रोजंदारीवर दुसरा शिक्षक नेमल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रोजंदारीवरचा शिक्षक निवृत्त असल्याने आणि त्याचे शाळेकडे लक्ष नसल्याने मुलांनी शिक्षण सोडून वर्गातच पत्ते खेळत जुगाराचा डाव मांडला आहे.
सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेत असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने बुधवारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला.
पहिली ते चौथीपर्यंतची ही एकशिक्षकी शाळा असून, तेथे १४ मुले शिक्षण घेतात. या मुलांना शिकवण्याचाही कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून ३०० रुपये रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवले. तोही निवांत बसून असल्याने, शिवकायला कोणी नसल्याने कंटाळलेल्या मुलांनी वर्गातच जुगाराचा डाव मांडल्याचे यावेळी दिसून आले.
तलासरीला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाले; पण त्यांना मदत करायला ना विस्तार अधिकारी आहे, ना केंद्रप्रमुख. त्यामुळे तालुक्यात शिक्षकांची मनमानी वाढली आहे. त्याचेच एक उदाहरण सूत्रकार डोंगरपाडा शाळेत उघड झाले.